राज्यसभेचं कालचं कामकाज तहकूब झाल्यानंतर सभागृहाची नियमित तपासणी करताना एका आसनाखाली नोटांची बंडलं आढळून आली. आज सकाळी राज्यसभेचं कामकाज सुरू झाल्यानंतर अध्यक्ष जगदीप धनखड यांनी सभागृहातील २२२ क्रमांकाच्या आसनाखाली नोटांची बंडलं आढळून आल्याची माहिती सदस्यांना दिली. हे आसन काँग्रेसचे खासदार अभिषेक मनु सिंघवी यांचं असून याप्रकरणी तपास सुरू असल्याचंही धनखड यांनी सांगितलं.
संसदीय कामकाजमंत्री किरेन रिजिजू यांनी सभापतींशी सहमती दर्शवत याप्रकरणाची गंभीरपणे चौकशी केली जावी असं सांगितलं. अशा घटनांमुळे सभागृहाची प्रतिष्ठा कमी होत असल्याबद्दल सभागृहाचे नेते जगत प्रकाश नड्डा यांनी चिंता व्यक्त केली. या घटनेच्या चौकशीबद्दल कोणताही आक्षेप नसल्याचं विरोधी पक्ष नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी सांगितलं.
दरम्यान, या घटनेप्रकरणी खासदार अभिषेक सिंघवी यांनी खुलासा केला आहे. सभागृहात जेव्हा जातो तेव्हा पाचशे रुपयाची एकच नोट जवळ बाळगतो, असं सिंघवी यांनी सांगितलं. काल दुपारी १२ वाजून ५७ मिनिटांनी सभागृहात गेलो आणि एक वाजता बाहेर पडल्याचं त्यांनी सांगितलं. खासदार अयोध्या रामी रेड्डी यांच्याबरोबर दीड वाजेपर्यंत कँटिनमध्ये होतो आणि त्यानंतर बाहेर पडल्याचं सिंघवी यांनी सांगितलं.