हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री-राष्ट्रमाता जिजाऊ यांची जयंती आज राज्यभरात मोठ्या उत्साहात साजरी होत आहे. जिजाऊंच्या जयंती सोहळ्यानिमित्त बुलढाणा जिल्ह्यातल्या सिंदखेड राजा इथल्या राजे लखुजी जाधव यांच्या राजवाड्यात राष्ट्रमाता जिजाऊंच्या जन्मस्थळी सूर्योदयावेळी शासकीय महापूजा करण्यात आली. केंद्रीय आयुष आरोग्य आणि कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रताप जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये ही पूजा झाली. यावेळी राजे लखोजी जाधव यांचे वंशज शिवाजी जाधव उपस्थित होते.
बीड शहरात राजमाता जिजाऊ यांच्या जयंती निमित्त त्यांच्या अर्धाकृती पुतळ्याला अभिवादन करण्यात आलं. तर परभणीतल्या जिजाऊ मंदिरात जन्मोत्सव साजरा करण्यात आला.