विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पक्षाचा जाहीरनामा आज प्रकाशित केला. जाहिरनाम्याच्या पहिल्या भागात मूलभूत गरजा, दुसऱ्या भागात दळणवळण, वीज, पाणी नियोजन, घनकचरा व्यवस्थापन, पर्यावरण जैवविविधता यांचा समावेश करण्यात आला आहे. तिसऱ्या भागात प्रगतीच्या संधी आणि राज्याचं कृषी धोरण आणि चौथ्या भागात मराठी अस्मिता हा विषय घेण्यात आल्याचं राज ठाकरे यांनी यावेळी सांगितलं. जाहीरनामा प्रसिद्ध करताना अनेकांनी आम्ही काय करू इतकच दिलं आहे. पण, आमच्या जाहीरनाम्यामध्ये आम्ही काय करू आणि कसं करू या गोष्टी देखील समाविष्ट केल्या आहेत, असंही राज ठाकरे यावेळी म्हणाले. महाराष्ट्रात चौकाचौकात छत्रपती शिवाजी महाराजांचे पुतळे आहेत. मग त्यांच्या मंदिरांची गरज काय? त्याऐवजी राज्यातल्या मुलांना शिक्षण मिळणे महत्त्वाचे आहे आणि शिवरायांनी उभारलेले गडकिल्ले चांगले होणे महत्त्वाचे आहे, असं राज ठाकरे यावेळी म्हणाले.
गेल्या १९ वर्षात आम्ही काय केलं यावरची पुस्तिकाही त्यांनी आज प्रसिद्ध केली. येत्या रविवारी मुंबईतल्या शिवाजी पार्क मैदानावर मनसेच्या सभेसाठी अद्याप परवानगी मिळालेली नाही. वेळ अपुरा असल्याने ही सभा न घेता मतदार संघांना भेटी देण्यात येतील, अशी माहिती त्यांनी यावेळी दिली.