महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेतली. या भेटीत दोन विषयांवर चर्चा झाल्याची माहिती ठाकरे यांनी या भेटीनंतर माध्यमांना दिली. सध्या मुंबई महानगरपालिका तोट्यात असून तोटा कमी करण्यासाठी मुंबई शहराच्या जमिनीखालून जाणाऱ्या विविध कंपन्यांच्या केबल्सवर कर आकारणी करावी, याबाबत आयुक्तांशी चर्चा झाल्याचं ठाकरे यावेळी म्हणाले.
तसंच, मुंबईत पालिका रुग्णालयांवर दुसऱ्या शहर किंवा परराज्यातून येणाऱ्या रुग्णांचा अतिरिक्त ताण पडत आहे. त्याचा आर्थिक बोजाही पालिकेवर पडत असून मुंबई बाहेरहून येणाऱ्या रुग्णांवरच्या उपचारांसाठी वेगळा दर ठेवता येईल का, यासंदर्भातही पालिका आयुक्तांशी चर्चा झाल्याची माहिती राज ठाकरे यांनी दिली.