राज्याच्या बहुतांश भागात पावसानं काल आणि आज हजेरी लावली आहे. नवी मुंबईत पावसामुळं रबाळे एमआयडीसी भागात डोंगरावरचे मोठे दगड खाली कोसळले आहेत. या भागातल्या रहिवाशांना सुरक्षित ठिकाणी हलवण्याचं काम सुरू आहे. पावसाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दलाचं प्रत्येकी एक पथक ठाणे, कुर्ला, घाटकोपर आणि पालघर इथं, तर तीन पथकं अंधेरीत तैनात करण्यात आली आहेत. ठाण्यातलं पथक शहापूर भागात मदत आणि बचावकार्यात गुंतलं आहे.
नाशिक जिल्ह्याच्या काही भागांमध्ये गेल्या २-३ दिवसांपासून जोरदार पावसानं हजेरी लावली आहे. सुरगाणा तालुक्यातल्या सोनगीर इथली एक महिला नाल्याच्या पुरात वाहून गेल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे. मुसळधार पावसामुळे कसाऱ्यापासून मुंबईकडे जाणारी रेल्वे वाहतूक ठप्प झाली आहे. पंचवटी एक्सप्रेससह अनेक गाड्या रद्द झाल्यानं प्रवाशांची गैरसोय होत आहे.
परभणी जिल्ह्यातल्या गंगाखेड तालुक्याच्या महातपुरी मंडळात ढगफुटी सदृश्य पावसामुळे काही गावांमध्ये पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात दोन दिवसांपासून अनेक ठिकाणी मुसळधार पाऊस झाला. यामुळे नद्यांची पाणीपातळी वाढली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात काल रात्रीपासून जोरदार पाऊस झाल्यामुळे जनजीवन विस्कळीत झालं आहे. बांद्याजवळ तेरेखोल नदीने इशारा पातळी ओलांडल्यामुळे प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे.