राज्यातल्या बहुतांश भागात आज पावसानं हजेरी लावली.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कुडाळ तालुक्यात माणगाव खोऱ्यात पूल पाण्याखाली गेले आहेत. त्यामुळे एसटी बस अडकून पडल्या आहेत. दरम्यान कर्ली आणि तेरेखोल नदी इशारा पातळी जवळून वाहत होत्या.
जालना शहरासह घनसावंगी तालुक्यातल्या मुरमा, कंडारी, आंतरवाली टेंभी, रामसगाव, शेवता, बानेगाव या भागात झालेल्या जोरदार पावसामुळे कपाशी, सोयाबीन, ऊस या पिकांमध्ये पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचले आहे.
धुळ्यात निम्न पांझरा प्रकल्पातून पाणी सोडण्यात आल्याने पांझरा नदीपात्रासह इतर नदीनाल्यांना पूर आला आहे. त्यामुळं नदी काठच्या नागरिकांना खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
बीड जिल्ह्यातल्या पाटोदा इथं आवड्याभरात दुस-यांदा भरपूर पाऊस झाल्यानं मांजरा नदीसह अनेक नद्या दुथडीभरून वाहात आहेत.
नाशिक जिल्ह्यात सुरू असलेल्या जोरदार पावसामुळे गंगापूर धरणातून विसर्ग सुरू आहे.
बुलडाणा जिल्ह्यात जलाशये पूर्णपणे भरली आहेत. जिल्ह्यातील खामगाव तालुक्यातील हिवरखेड गावाजवळचा पूल पावसाच्या पाण्याने वाहून गेल्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे.