रत्नागिरी जिल्ह्याला परतीच्या पावसानं झोडपून काढलं असून जिल्ह्यात या महिन्यात सरासरी दीडशे मिलिमीटर पाऊस झाला आहे. एक जूनपासून आतापर्यंत जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या १२९ टक्के पाऊस झालेला आहे. गेल्या आठवड्यात झालेल्या पावसामुळे भातपिकाचं नुकसान झालं असून, कृषी विभागाकडून पंचनामे सुरू आहेत. पावसामुळे आतापर्यंत केवळ ३५ टक्के क्षेत्रावरचीच कापणी होऊ शकली. देवरूख, राजापूरसह काही ठिकाणी वीज पडल्यामुळे पाच कामगार जखमी झाले आहेत. चिपळूणमधल्या परशुराम घाटात दोन दिवसांपूर्वी संरक्षक भिंत कोसळल्यानं मातीचा भराव वाहून गेला आहे.
पालघर जिल्ह्यात गेले १०-१२ दिवस विजांच्या कडकडाटांसह सुरु असलेल्या जोरदार पावसामुळे भात आणि नाचणी पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे.
जळगांव शहरासह जिल्हयात परतीच्या जोरदार पावसानं संध्याकाळपासून हजेरी लावली आहे. विजांच्या कडकडाटांसह झालेल्या या वादळी पावसामुळे कापूस, मका आणि कडधान्याच्या पिकांचं नुकसान झालं आहे. अग्नावती आणि गडद नदीला सोमवारी आलेल्या पुरात तीन जणांचा बुडून मृत्यू झाला होता. नगरदेवळा इथं वीज पडल्यामुळे एका वृद्धाचा तर दुसऱ्या घटनेत बैल आणि २ वासरांचा मृत्यू झाला आहे.