गोंदिया आणि भंडारा या जिल्ह्यांत पावसाच्या दमदार हजेरीनं शेतकरी सुखावला असून पावसाच्या पाण्यावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांनी पेरण्या सुरू केल्या आहेत.
गोंदिया जिल्ह्यात आज पावसानं दमदार हजेरी लावल्यानं भातपिकाला याचा मोठा फायदा झाला आहे. पाण्याच्या पंपाची सोय उपलब्ध नसलेल्या वरथेंब शेतकऱ्यांची पावसाची प्रतीक्षा संपली असून, भात रोवणीला सुरुवात झाल्याचं आमच्या बातमीदारानं कळवलं आहे.
भंडारा जिल्ह्यातही बऱ्याच प्रतीक्षेनंतर पावसाने मेघगर्जनेसह जोरदार हजेरी लावली आहे. तर पवनी तालुक्यात कोंडा इथल्या आठवडी बाजारात पाणी शिरल्याने संपूर्ण बाजार जलमय झाला. अनेकांच्या घरातदेखिल पाणी शिरलं आहे.
दरम्यान, गोसीखुर्द धरणाच्या पाणलोट क्षेत्रात सतत पाऊस होत असल्यानं पाणी पातळी नियंत्रित ठेवण्याकरिता धरणाचे पाच दरवाजे अर्ध्या मीटरनं उघडण्यात आले असून २५ हजार ३७४ क्यूसेक अर्थात घनफूट प्रति सेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग होत आहे. त्यामुळे नदी पात्राजवळच्या गावांना तसंच नदीतून प्रवास करणाऱ्या नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे.