राज्यात पावसाचा जोर काहीसा ओसरला, तरी विदर्भातल्या काही जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरू आहे. सिंचन प्रकल्पांच्या पाणलोट क्षेत्रांमध्येही चांगला पाऊस झाल्याने जलसाठ्यात वाढ झाली आहे. सध्या विदर्भातल्या सहा मोठ्या प्रकल्पांमधून विसर्ग सुरू आहे. यामध्ये अमरावती जिल्ह्यातल्या उर्ध्व वर्धा, यवतमाळ जिल्ह्यातल्या बेंबळा, नागपूर जिल्ह्यातल्या पेंच तोतलाडोह, गोंदिया जिल्ह्यातल्या इटियाडोह, भंडारा जिल्ह्यातल्या गोसीखुर्द, आणि वर्धा जिल्ह्यातल्या निम्न वर्धा प्रकल्पांचा समावेश आहे. वैनगंगा, वर्धा आणि बेंबळा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. नागपूर विभागातल्या मोठ्या प्रकल्पांमध्ये ७४ पूर्णांक ११ टक्के, तर अमरावती विभागातल्या प्रकल्पांमध्ये ६० पूर्णांक १२ टक्के पाणीसाठा झाला आहे.
अहमदनगर जिल्ह्यातल्या मुळा धरणाची पाणी पातळी वाढल्यानं आज धरणातून दोन हजार घनफूट प्रतिसेकंद वेगाने पाण्याचा विसर्ग सुरु करण्यात येणार आहे. आपत्कालीन परिस्थितीमध्ये आवश्यकता भासल्यास मुळा धरणातून नदीपात्रामध्ये टप्प्याटप्प्याने विसर्ग वाढवण्यात येणार असून, नदीकाठच्या गावांनी आवश्यक ती दक्षता घेण्याचे आवाहन पाटबंधारे विभागानं केलं आहे.