मतदान केंद्रावर कार्यरत कर्मचाऱ्यांसाठी रेल्वे विशेष लोकल चालवणार असल्याची माहिती मध्य रेल्वेचे मुख्य जनसंपर्क अधिकारी स्वप्निल नीला यांनी दिली. मेट्रोनंही अतिरिक्त वेळेत सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. मुंबईत दिव्यांग आणि ज्येष्ठ नागरिक मतदारांना त्यांच्या घराजवळून मतदान केंद्रापर्यंत जाण्यासाठी मोफत वाहन व्यवस्थाही उपलब्ध सोयही आहे.
यंदा मतदानाचं प्रमाण वाढावं यासाठी निवडणूक आयोग, स्थानिक प्रशासन, स्वयंसेवी संस्था यांनी विविध उपाययोजना केल्या आहेत. सर्वत्र मतदान केंद्रांची माहिती देणाऱ्या मतदान चिठ्ठ्या निवडणूक आयोगानं घरोघरी पोहोचवल्या आहेत. मुंबईत एकाच ठिकाणी मोठ्या प्रमाणात मतदान केंद्र असल्यानं विविध रंगांनी ही केंद्र सजवली आहेत आणि मतदान चिठ्ठ्यांवरही त्या रंगांचे स्टिकर लावले आहे. त्यामुळं मतदारांना त्यांचं मतदान केंद्र शोधणं सोपं होईल.