देशातल्या महत्त्वाच्या ६० रेल्वे स्थानकांच्या फलाटावर गाडी आल्याशिवाय प्रवाशांना प्रवेश मिळणार नाही. गाडी येईपर्यंत या प्रवाशांना स्थानकाबाहेरच्या प्रतीक्षा गृहात थांबावं लागेल. रेल्वे स्थानकांवर होणाऱ्या गर्दीचं नियंत्रण करण्यासाठी रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली नवी दिल्लीत झालेल्या बैठकीत हा निर्णय झाला. नवी दिल्ली, आनंद विहार, वाराणसी, अयोध्या आणि पाटणा स्थानकावर याची प्रायोगिक तत्त्वावर अंमलबजावणी सुरू झाली आहे.
देशभरातल्या ६० स्थानकांवर प्रवेशाचं संपूर्ण नियंत्रण केलं जाणार असून केवळ कन्फर्म तिकीट असणाऱ्या प्रवाशांना फलाटावर प्रवेश दिला जाईल. प्रतीक्षा यादीतलं किंवा इतर तिकिट असलेल्यांना स्थानकाबाहेरच्या वेगळ्या प्रतीक्षालयात थांबावं लागेल. अवैधरित्या स्थानकात होणारे प्रवेश रोखण्यासाठी इतर प्रवेश मार्ग बंद करण्याचा निर्णयही रेल्वेनं घेतला आहे.
महाकुंभ मेळ्यात गर्दीच्या नियंत्रणासाठी उपयोगी पडलेले रुंद पादचारी पूल, सीसी टीव्ही कॅमेऱ्याद्वारे निगराणी, वॉर रूमची स्थापना असे पर्याय वापरण्याचा निर्णयही घेण्यात आला. सर्व रेल्वे स्थानकांवर स्थानक संचालक म्हणून एका वरिष्ठ अधिकाऱ्याची नियुक्ती करण्याचा निर्णयही झाला. गर्दी टाळण्यासाठी या अधिकाऱ्याला तिकीट विक्रीवर निर्बंध लादण्याचेही अधिकार असतील. रेल्वेच्या कर्मचाऱ्यांना नव्यानं तयार केलेलं ओळखपत्र आणि गणवेशही दिला जाणार आहे.