बदलापूर इथल्या एका शाळेत दोन विद्यार्थिनींवर झालेल्या लैंगिक अत्याचार प्रकरणी संतप्त नागरिकांनी बदलापूर रेल्वेस्थानकात रेल्वे रोको आंदोलन केलं. या घटनेतल्या अपराध्याला फाशी देण्याची मागणी जमाव करीत होता. सकाळपासून सुरु झालेल्या या आंदोलनाला दुपारी हिंसक वळण लागलं. संतप्त जमावाला पांगवण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला तेव्हा जमावानं पोलिसांवर दगडफेक केली. अखेर अधिक कुमक मागवून जमावाला पांगवण्यात आलं.
याप्रकरणी संशयित आरोपीला अटक केली असून हा खटला जलदगती न्यायालयात चालवण्याचे निर्देश पोलिसांना दिले सांगितल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. या घटनेच्या चौकशीसाठी विशेष तपास पथक स्थापन करण्याचे आदेश जारी केले असून गुन्हा दाखल करण्यात चालढकल करणाऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित केलं आहे, असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी एक्स समाजमाध्यमावर सांगितलं.
ग्रामविकास मंत्री गिरीश महाजन यांनी आंदोलनस्थळी भेट देऊन जमावाला शांत राहण्याचं आवाहन केलं. याप्रकरणी दोषींवर कठोर कारवाई करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. राज्य महिला आयोगानं या प्रकरणाची गंभीर दखल घेऊन पोलिसांनी आत्तापर्यंत केलेल्या तपासाचा अहवाल मागवला आहे. संबंधित शाळेनं माफीनामा जारी केला असून शाळेच्या मुख्याध्यापिकेला निलंबित करण्यात आलं आहे. तसंच मुलांची जबाबदारी असलेल्या दोन सेविकांनाही कामावरून कमी करण्यात आलं आहे.
जवळजवळ १२ तास चाललेल्या या आंदोलनामुळे रेल्वेसेवेवर परिणाम झाला. मध्य रेल्वेच्या कल्याण कर्जत मार्गे जाणाऱ्या लांब पल्ल्याच्या ७ गाड्या पनवेलमार्गे वळवल्या आहेत. उपनगरी गाड्या काही काळ अंबरनाथपर्यंतच चालवल्या जात होत्या.
बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणावर निषेधाच्या प्रक्रीया उमटत आहेत.
गुन्हेगारांना कठोर शिक्षा व्हावी अशी मागणी विधानपरिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केली आहे. विधानसभेतले विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनीही राज्यशासनाच्या धोरणांवर टीका केली आहे.
आपल्या सरकारनं शक्ती कायदा आणण्यासाठी मसुदा तयार केला आहे. या सरकारनं ते विधेयक मंजूर करून शक्ती कायद्याची शक्ती दाखवून द्यावी, असं आवाहन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केलं. राज्यात मुलींच्या सुरक्षिततेचा प्रश्न गंभीर झाला असल्याचं सांगत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जयंत पाटील यांनी राज्यशासनाच्या धोरणांवर टीका केली.