निवड प्रक्रियेला सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिलेलं असताना मुख्य निवडणूक आयुक्तांच्या निवडीचा निर्णय मध्यरात्री जाहीर करणं, प्रधानमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना अशोभनीय असल्याची टीका लोकसभेतले विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केली आहे.
सर्वोच्च न्यायालयात याप्रकरणी सुनावणी होणार असल्यानं काल रात्री या निवडीसाठी आयोजित केलेली बैठक पुढं ढकलण्याची सूचना राहुल गांधी यांनी केली होती. आपलं मत वेगळं असल्याचं पत्रही निवड समितीला दिलं होतं, असं त्यांनी समाजमाध्यमावर स्पष्ट केलं आहे. ते निवड समितीचे सदस्य आहेत.
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचं उल्लंघन करुन, आणि निवड समितीतून सरन्यायाधिशांना वगळून मोदी सरकारनं आपल्या निवडणूक प्रक्रियेच्या एकात्मतेविषयी कोट्यवधी मतदारांची चिंता वाढवली आहे, असं राहुल गांधी यांनी म्हटलं आहे.