राज्यातल्या ५ लाख युवांना रोजगार देण्याची क्षमता असलेले ७ लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सत्ताधारी महायुतीमुळे महाराष्ट्रातून गुजरातला गेल्याचा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे. ते आज मुंबईत पत्रकार परिषदेत बोलत होते. यंदाच्या विधानसभा निवडणुकीत रोजगार, महागाई, महिलांचे प्रश्न यासह महाराष्ट्राची संपत्ती महाराष्ट्राच्या जनतेला मिळणं हेच महत्त्वाचे मुद्दे आहेत, असं सांगून त्यांनी महाविकास आघाडीच्या जाहीरनाम्यातल्या आश्वासनांचा पुनरुच्चार केला.
धारावी पुनर्विकास प्रकल्पासह विमानतळं, संरक्षण उत्पादनं, बंदरं इत्यादींची कंत्राटं उद्योगपती गौतम अदानी यांच्या कंपनीला मिळाल्यावरून त्यांनी सरकारवर टीका केली. धारावीचा पुनर्विकास स्थानिकांचं हित लक्षात घेऊन केला जाईल. हा मुद्दा त्यापेक्षा व्यापक आहे, खारफुटीचं जंगल, मुंबईत येणारा पूर यावरही उपाय करणं गरजेचं असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली.
भारतीय जनता पक्ष ईडी, सीबीआय, आयकर विभाग इत्यादीचा गैरवापर करत असल्याचा आरोपही त्यांनी केला.