भारतीय हवामान विभागानं पुणे जिल्ह्याला अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. त्या पार्श्वभूमीवर धोकादायक भागातल्या नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवावं, त्यासाठी एनडीआरएफ, एसडीआरएफ, सैन्याची मदत घ्यावी असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत.
तसंच, बाधित लोकांसाठी निवारास्थाने, कपडे, जेवण इत्यादी सर्व व्यवस्था करण्यात यावी असे निर्देशही त्यांनी दिले आहेत. खडकवासला धरणातला विसर्ग दिवसा वाढवून पाणीसाठा ६५ टक्क्यांवर आणावा, जेणेकरून रात्रीच्यावेळी पाऊस झाला, तर नदीपात्रात अधिक विसर्ग करावा लागणार नाही, अशी सूचना मुख्यमंत्र्यांनी दिली. तसंच महापालिकेने ध्वनिक्षेपक आणि समाज माध्यमांद्वारे नागरिकांना खबरदारी घ्यायच्या सूचना द्याव्यात, आणि वेळोवेळी पूरपरिस्थितीची माहिती द्यावी, असं आवाहनही त्यांनी अधिकाऱ्यांना केलं.