पुण्यातल्या दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात तातडीनं उपचार न मिळाल्यानं तनिषा भिसे या महिलेचा मृत्यू झाल्याप्रकरणी पुण्याच्या धर्मादाय सहआयुक्तांच्या अध्यक्षतेखाली चौकशी समिती स्थापन करण्याचे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज दिले. या समितीत उपसचिव, कक्ष अधिकारी, धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष, मुख्यमंत्री सचिवालय यांचे प्रतिनिधी, मुंबईच्या सर जे. जे. रुग्णालय समूहाचे अधीक्षक हे सदस्य असतील. त्याचप्रमाणे या घटनेची तज्ञ डॉक्टरांच्या समितीद्वारे चौकशी करण्याचे आदेश उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत. आरोग्य विभागानं तातडीनं, पारदर्शक आणि निष्पक्षपणे चौकशी पूर्ण करावी, अशा सूचना त्यांनी दिल्या.
बरीच धर्मादाय रुग्णालयं सेवा देत नाही, त्यामुळे धर्मादाय रुग्णलयांमध्ये एक आरोग्यदूत नेमणार असल्याचं वैद्यकीय शिक्षण राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांनी आज नाशिक इथं वार्ताहरांना सांगितलं.