मुंबई उपनगर जिल्ह्यातल्या विकासकामांसाठी १ हजार ८८ कोटी रुपयांची तरतूद केल्याची माहिती पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांनी आज जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत दिली. या निधीपैकी एक हजार १२ कोटी जिल्हा वार्षिक योजनेसाठी, अनुसूचित जाती उपयोजनेसाठी ७१ कोटी आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरच्या योजनेसाठी ५ कोटी ७१ लाख निधी देण्यात येणार आहे, असं लोढा यांनी सांगितलं. या बैठकीला खासदार संजय दिना पाटील, आमदार प्रवीण दरेकर, मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर, महानगरपालिकेचे आयुक्त भूषण गगराणी उपस्थित होते.
नियोजन विभागानं सन २०२४-२५ साठी ३३७ कोटी ३९ लाख रुपये निधी उपलब्ध करुन दिला आहे. या वर्षासाठी १९ कोटी ९० लाख रुपयांच्या नवीन कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाली असून सन २०२३-२४ मध्ये प्रशासकीय मान्यता मिळालेल्या कामांचा उर्वरित १८५ कोटी ५६ लाख रुपये निधी वितरीत केल्याचं लोढा यांनी सांगितलं.