अभय हा प्रकल्प देशभरातले ट्रक चालकांचे जीवनमान सुधारण्याच्या उद्देशाने सुरू झालेला उपक्रम आहे. ट्रकचालकांना वाहतूक करताना येणारी आव्हानं, त्यांचं शारीरिक तसंच मानसिक आरोग्य यांना प्राधान्य देणारी परिसंस्था तयार करणं हा या प्रकल्पाचा मुख्य उद्देश आहे. यात व्यापक स्तरावर आरोग्य तपासणी, डोळ्यांची तपासणी आणि चश्मा वाटप करणं, समुपदेशन आणि ताण व्यवस्थापनासाठी मार्गदर्शन, वाहतूक नियमांविषयी आणि सामाजिक सुरक्षा योजनांची माहिती देणं अशा विविध माध्यमातून ट्रक चालकांचं जीवनमान सुधारण्यावर भर दिला जातो. या प्रकल्पामुळे गेल्या वर्षभरात सहा राज्यं आणि १५ शहरांमधल्या ५० हजार ट्रकचालकांच्या जीवनावर सकारात्मक परिणाम झाला आहे.
या प्रकल्पाच्या पथदर्शी टप्प्याच्या यशस्वी पूर्ततेबद्दल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितिन गडकरी यांनी कौतुक केलं. नवी दिल्लीत इथे ग्रामीण विकास आणि तंत्रज्ञान केंद्राच्या अभय प्रकल्पाच्या समारोप कार्यक्रमाला ते संबोधित करत होते.