गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करण्याचं स्वप्न साकारण्याकडे वाटचाल सुरू झाल्याचं, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. ते काल गडचिरोलीत लॉईड्स मेटल कंपनीच्या डी आर आय प्रकल्पाच्या कोनशीलेचं अनाण तसंच विविध उपक्रमांचं उद्घाटन केल्यानंतर बोलत होते. गडचिरोली जिल्ह्यात सर्वार्थाने मोठं परिवर्तन दिसून येत असल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. ते म्हणाले. ‘‘कोणसरीचा हा जो प्रकल्प, ज्याचं भूमिपूजन मुख्यमंत्री असताना मी केलं होतं, आता त्याच्या पहिल्या फेजचं उद्घाटन या ठिकाणी करतोय. अनेक प्रकल्पांचा आज उद्घाटन भूमिपूजन होत आहे. दहा हजार लोकांना रोजगार मिळालाय.
पाच हजारांना अजून दहा महिन्यांमध्ये काम पूर्ण झाल्यानंतर रोजगार त्या ठिकाणी मिळणार आहे. त्यामुळे मोठ्या प्रमाणात जे ट्रान्सफॉर्मेशन आहे, ते आपल्याला पाहायला मिळतंय आणि आपलं जे स्वप्न आहे की, गडचिरोलीला स्टील सिटी ऑफ इंडिया करायचं, त्याकडे वाटचाल आपली सुरू झाली आहे.’’ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते लॉईड्स मेटल कंपनीची शाळा, रुग्णालय, कर्मचारी निवासस्थानं, जिमखाना आणि बालोद्यान आदी उपक्रमांचं उद्घाटन यावेळी करण्यात आलं. दरम्यान, अहेरी ते गर्देवाडा या बस सेवेला मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात आला. स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनंतर ही बससेवा सुरू होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
‘‘मला अतिशय आनंद आहे कारण हा जो सगळा भाग आहे, या भागांमध्ये वर्षानुवर्ष धुळणवळणाची साधनं नव्हती. रस्ते नव्हते. आणि माओवाद्यांचा डॉमिनन्स असलेला असा हा भाग होता. आपल्या पोलिसांनी अतिशय चांगलं काम करत त्यांचा डॉमिनन्स संपवलाय. आणि आपल्या सगळ्या विभागांनी या ठिकाणी प्रशासनाने चांगलं काम केलं. रस्त्याचे काम असेल पीडब्ल्यूडी ने केलेलं पुलाचं काम असेल याच्यामुळे थेट आता छत्तीसगडला आपण जोडले गेलो आहोत. आणि ७५ वर्षानंतर पहिल्यांदा फर्स्ट सेवा या भागामध्ये सुरू होतेय. लोकांना एक मोठी सुविधा मिळते.’’ नक्षल चळवळीच्या नेत्या ताराक्का आणि त्यांच्या दहा सहकाऱ्यांनी काल आत्मसमर्पण केलं. या सर्वांच्या पुनर्वसनाची ग्वाही मुख्यमंत्र्यांनी दिली. नक्षल चळवळीचा बिमोड करणाऱ्या सी सिक्स्टी जवानांचा यावेळी सत्कार करण्यात आला. गडचिरोली पोलीस दलाला पाच बस, १४ चारचाकी आणि ३० दुचाकींचं वितरण मुख्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आलं. जिल्ह्यातल्या विविध विकास कामांची त्यांनी यावेळी पाहणी केली.