महायुतीच्या काळात महाराष्ट्रात येऊ घातलेले उद्योग गुजरातमध्ये नेण्यात आले, यामुळे राज्यातली दहा लाख कोटी रुपयांची गुंतवणूक बाहेर गेली, अशी टीका काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियंका गांधी यांनी केली आहे. त्या आज गडचिरोली जिल्ह्यात देसाईगंज इथं आयोजित प्रचारसभेत बोलत होत्या.
केंद्र सरकार महत्त्वाची बंदरं, विमानतळ आणि अन्य सरकारी कंपन्या उद्योगपतींच्या घशात घालत असल्याचा आरोप त्यांनी केला. महाराष्ट्रात अडीच लाख रिक्त पदं असून बेरोजगारी प्रचंड वाढली आहे, युवक आत्महत्या करत आहेत, त्यांच्यासाठी काही करण्याऐवजी सरकारनं उद्योगपतींचं १६ लाख कोटी रुपयांचं कर्ज माफ केलं. हे धोरण चुकीचं आहे, असं त्या म्हणाल्या.
राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यावर नागरिकांना २५ लाख रुपयांचा आरोग्य विमा, तसंच शेतकऱ्यांना कर्जमाफी देण्याचं आश्वासन प्रियंका गांधी यांनी दिलं. जातनिहाय जनगणना करायला आणि आरक्षणाची मर्यादा ५० टक्क्यापेक्षा वाढवायला प्रधानमंत्री नरेंद्र मोदी का घाबरतात, असा सवाल त्यांनी या सभेत केला.
काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्नीथला, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, विधानसभेचे विरोधी पक्ष नेते विजय वडेट्टीवार, छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री भूपेश बघेल, यांच्यासह अन्य नेते उपस्थित होते. प्रियंका गांधी यांनी आज नागपुरात रोड शो केला. त्याला नागरिकांची प्रचंड गर्दी दिसून आल्याचं आमच्या वार्ताहरानं कळवलं आहे.