देशाच्या टीबी विरोधातल्या लढ्यात, अधिक रुग्णसंख्या असलेल्या टीबी जिल्ह्यांवर लक्ष केंद्रित करून १०० दिवसांच्या विशेष मोहीमेमुळे देश बळकट झाला आहे असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. समाज माध्यमांवरील एका संदेशात मोदी यांनी सांगितलं की, रुग्णांना दुप्पट मदत, जन भागिदारी, नवीन औषधं, तंत्रज्ञानाचा वापर आणि निदानाची उत्तम साधनं यासह भारत विविध पद्धतींनी टीबीशी लढा देत आहे. क्षयरोगाचा नायनाट करण्यासाठी सर्वांनी एकत्र येण्याचं आवाहन त्यांनी केलं.
दरम्यान, देशव्यापी क्षयरोग निर्मूलन अभियानाला काल केंद्रीय आरोग्य आणि कुटुंबकल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांच्या हस्ते हरयाणात पंचकुला इथं प्रारंभ झाला. देशातली ३३ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेशांतल्या मिळून ३४७ जिल्ह्यांत आजपासून १०० दिवस ही मोहिम राबवली जाणार आहे. यात क्षयरोगाविषयी जनजागृती करणं आणि क्षयरोगाबद्दलच्या गैरसमजुती दूर करणं यांचा समावेश आहे.