लस निर्मिती आणि लसीकरणासाठी जागतिक आघाडी आणि क्वाड उपक्रमाअंतर्गत कर्करोग मूनशॉट उपक्रमामध्ये भारत, साडेसात दशलक्ष डॉलर्सचं, आणि गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोग प्रतिबंधासाठी ४० दशलक्ष लस मात्रांचं योगदान देईल अशी घोषणा प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केली. क्वाड शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर डेलावेर इथं आयोजित कर्करोग मूनशॉट उपक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. सहज उपलब्ध होऊ शकेल अशी आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान करण्याबद्दल क्वाड समुह देशांच्या सामायिक निर्धार अशा उपक्रमातून प्रतिबिंबित होत असल्याचं ते यावेळी म्हणाले. या उपक्रमासाठी भारत आपला अनुभव आणि कौशल्य परस्परांसोबत सामायिक करायला इच्छुक आहे असं म्हणत, या उपक्रमाकरता रोग निदान संच देण्याची घोषणाही त्यांनी केली.
न्यूयॉर्कमधे प्रधानमंत्री उद्या संयुक्त राष्ट्रसंघाच्या महासभेत चांगल्या भविष्यासाठी बहुआयामी उपाययोजना या विषयावरच्या शिखर परिषदेला संबोधित करणार आहेत. या निमित्तानं ते अनेक देशांच्या प्रमुख नेत्यांसोबत द्विपक्षीय बैठका घेणार असून, महत्त्वाच्या आंतरराष्ट्रीय आणि प्रादेशिक मुद्द्यांवर चर्चा करणार आहेत.