तरुणांच्या क्षमतेमुळे भारत लवकरच विकसित होईल, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमात युवा नेत्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. भारतातले तरुण उल्लेखनीय` परिवर्तन घडवून आणत आहेत, आपला तरुण पिढीवर विश्वास असून तरुणांकडे प्रत्येक अडचणीचं उत्तर आहे, असे गौरवोद्गार प्रधानमंत्र्यांनी काढले. महत्त्वाकांक्षी उद्दिष्टं साध्य करण्यासाठी देशातल्या प्रत्येक नागरिकाचा सक्रिय सहभाग आणि सामूहिक प्रयत्न आवश्यक आहे, असं मोदी म्हणाले. यासाठी मोठमोठी स्वप्नं पाहायला हवी असं त्यांनी सांगितलं.
विकसित भारत हा आर्थिक, सामरिक, सामाजिक आणि सांस्कृतिकदृष्ट्या सक्षम असेल, असं प्रधानमंत्री म्हणाले. मागच्या दहा वर्षात २५ कोटी लोक गरीबी रेषेच्या वर आले असून भारत ५ ट्रिलियन अर्थव्यवस्थेकडे झपाट्याने वाटचाल करत आहे, असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला. पुढच्या दहा वर्षात देशाची अर्थव्यवस्था १० ट्रिलियनचा टप्पा पार करेल, असा आशावादही त्यांनी व्यक्त केला.
यावेळी प्रधानमंत्र्यांनी स्वामी विवेकानंद यांचं स्मरण केलं. देशातल्या तरुणांवर स्वामी विवेकानंदांचा खूप विश्वास होता, त्यामुळे तरुण विकसित भारताचं स्वप्न नक्कीच पूर्ण करतील असं प्रधानमंत्री म्हणाले. या उपक्रमाद्वारे ज्या सूचना आणि कल्पना तरुण नेत्यांकडून केल्या जातील, त्या राष्ट्रीय धोरणात समाविष्ट केल्या जातील अशी घोषणा यावेळी प्रधानमंत्री मोदी यांनी केली. एक लाख नव्या तरुण लोकांना राजकारणात आणण्याचा मोदी यांनी यावेळी पुनरुच्चार केला.
विकसित भारत यंग लीडर्स डायलॉग या कार्यक्रमाला १० जानेवारीपासून सुरुवात झाली. प्रधानमंत्री मोदी यांनी देशभरातल्या जवळपास तीन हजार युवा नेत्यांशी संवाद साधला. तसंच दहा विषयांवरल्या सर्वोत्कृष्ट निबंधांच्या संकलनाचं प्रकाशन केलं.