नवी दिल्लीत प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होणारे राष्ट्रीय छात्र सेना म्हणजे एनसीसीचे छात्र, राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक, चित्ररथ कलाकार आदींशी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज संवाद साधणार आहेत. पडद्याच्या मागे असणारे चित्ररथ कलाकार आणि एनसीसी छात्र यांच्याशी पंतप्रधान 7 लोककल्याण मार्ग या निवासस्थानी संवाद साधतील.
यंदा विविध राज्यं, केंद्रशासित प्रदेश आणि विविध केंद्रीय मंत्रालयांचे 31 चित्ररथ प्रजासत्ताक दिन सोहळ्यात सहभागी होणार आहेत. यंदा या सोहळ्याची स्वर्णिम भारत – वारसा आणि विकास अशी मध्यवर्ती संकल्पना आहे. राज्यघटनेच्या अमृतमहोत्सवानिमित्त दोन विशेष चित्ररथही असणार आहेत. भगवान बिरसा मुंडा, सरदार वल्लभभाई पटेल यांची दीडशेवी जयंती, तसंच हवामान विभागाचा दीडशेवा स्थापना दिन यांच्या निमित्तानंही चित्ररथ सादर होणार आहेत.
प्रजासत्ताक दिनाच्या मुख्य संचलनाची कर्तव्य पथावर रंगीत तालीम पार पडली. प्रजासत्ताक दिनी राजधानीत होणाऱ्या मुख्य सोहळ्यात प्रजासत्ताक दिनाच्या राजधानीतील कर्तव्यपथावरील मुख्य सोहळ्यावेळी ध्वजारोहणानंतर महाराष्ट्राची कन्या फ्लाईंग ऑफिसर दामिनी देशमुख ध्वजावर पुष्पवृष्टी करणार आहेत. बीड जिल्ह्याच्या वडवणी तालुक्यातील देवडी गावच्या दामिनी देशमुख वायुदलात फ्लाईंग ऑफिसर म्हणून कार्यरत आहेत.