प्रधानमंत्रीं नरेंद्र मोदी यांनी काल आंध्र प्रदेश आणि तेलंगण राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना दूरध्वनी करुन तिथल्या पूरस्थितीचा आढावा घेतला. दोन्ही राज्यांना शक्य ती सर्व मत करण्याचं आश्वासन प्रधानमंत्र्यांनी दिलं आहे. राज्य सरकार युद्धपातळीवर मदत आणि बचाव कार्य करत आहे. विजयवाडा जिल्ह्यात पुरामुळे बुडामेरू ओढ्याला तडा गेल्यानं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे. मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांनी पूरग्रस्त भागाला भेट देऊन नागरिकांना अन्न, पाणी आणि आवश्यक औषधांचा व्यवस्थित पुरवठा करावा असे आदेश अधिकाऱ्यांना दिले. त्यांनी केंद्रिय गृहमंत्री अमित शहा यांच्याशीही चर्चा केली. विजयवाड्यात मदतीसाठी राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन दलाची 6 पथकं, 40 बोटी आणि 6 हेलिकॉप्टर्स पाठवली जातील असं शहा यांनी नायडू यांना सांगितलं. दरम्यान पूरस्थितीमुळं राज्यातल्या शाळा महाविद्यालयांना आज सुटी देण्यात आली आहे.
तेलंगणमध्ये खम्मम, महाबौबाद आणि सूर्यापेट जिल्ह्यांना अतीवृष्टीचा सर्वाधिक फटका बसला आहे. या जिल्ह्यांमधल्या शेकडो गावांना पुराच्या पाण्याचा वेढा बसला आहे. हजारो नागरिक टेकड्यांवर, घरांच्या छतांवर आणि महामार्गांवर अडकून पडले आहेत. मदत आणि बचाव कार्यासाठी राज्यात एनडीआरएफ ची 9 पथकं तैनात करण्यात आली आहेत. पुरात रेल्वेमार्गांचा काही भाग वाहून गेला असून काझीपेट विजयवाडा भागात पाच रेल्वेगाड्या पुराच्या पाण्यात अडकल्या आहेत. तर तेलंगणला इतर राज्यांशी जोडणाऱ्या महामार्गावर वाहनांच्या कित्येक किलोमीटर लांब रांगा लागल्या आहेत.