हिंद-प्रशांत महासागर क्षेत्राचा विकास आणि शांतता यासाठी इथल्या सर्व देशांनी मुक्त, सर्वसमावेशक, विकासानुकूल असणं आणि नियमांचं पालन करणं गरजेचं आहे असं ठाम प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी 19 व्या पूर्व आशियाई देशांच्या शिखर परिषदेत केलं. संपूर्ण हिंद प्रशांत क्षेत्रासाठी दक्षिण चीन समुद्रात शांतता, सुरक्षा आणि स्थैर्य कायम असणं महत्त्वाचं आहे या मुद्द्यावरही पंतप्रधान मोदी यांनी आपल्या भाषणात भर दिला.
जगात विविध देशांमध्ये सुरू असलेल्या संघर्षाबाबत चिंता व्यक्त करताना सर्वांचाच दृष्टीकोन विस्तारवादाचा नाही तर विकासाचा असला पाहिजे असं मत त्यांनी व्यक्त केलं. परस्परांमधील समस्यांवर युद्धभूमीवर तोडगा निघू शकत नाही या आपल्या मताचा त्यांनी पुनरुच्चार केला. शांततेसाठीच्या प्रयत्नांमध्ये सर्व प्रकारची मदत करणं भारत यापुढेही सुरूच ठेवेल असं प्रधानमंत्री मोदी यांनी सांगितलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत काल भारत आणि लाओ यांच्यात सहा सामंजस्य करार करण्यात आले. दोन दिवसांच्या लाओ दौऱ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काल संध्याकाळी मायदेशी परतले.