भारताची पुढची २५ वर्षं कशी असतील, याचा रोडमॅप युवक तयार करत आहेत, असे प्रशंसोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज काढले. स्वामी विवेकानंद यांच्या जयंतीदिनी साजऱ्या केल्या जाणाऱ्या राष्ट्रीय युवा दिनानिमित्त नवी दिल्लीतल्या भारत मंडपम इथं आयोजित कार्यक्रमात युवा नेत्यांशी संवाद साधताना ते बोलत होते. स्वामी विवेकानंदांचा सर्वात जास्त विश्वास युवकांवर होता. प्रत्येक समस्येवर युवक उत्तर शोधतील, असा त्यांचा विश्वास होता. त्यावर आपलाही ठाम विश्वास असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
विकसित भारत युवा नेता संवाद २०२५ अंतर्गत, भारतापुढच्या आव्हानांना तोंड देऊ शकतील अशा शाश्वत विकासावरचे नवोन्मेषशाली उपक्रम युवकांनी भारत मंडपममधल्या प्रदर्शनात मांडले आहेत. प्रधानमंत्र्यांनी या प्रदर्शनाला भेट देऊन या युवकांशी संवाद साधला. तसंच, तंत्रज्ञान, शाश्वतता, महिला सक्षमीकरण, उत्पादनं आणि शेती यासारख्या विषयांवर दहा उत्कृष्ट निबंधांच्या पुस्तकांचं प्रकाशन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं.