देशाच्या अन्न उद्योगात नवोन्मेष, शाश्वतता आणि सुरक्षिततेचे जागतिक मानक स्थापन करण्यासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्ली इथं आयोजित वर्ल्ड फूड इंडिया २०२४ परिषदेला आज पहिल्या दिवशी त्यांनी व्हिडीओ संदेशाद्वारे संबोधित केलं. प्रगतीशील कृषी पद्धती, भक्कम प्रशासकीय यंत्रणा आणि आधुनिक तंत्रज्ञान याद्वारे खाद्य प्रक्रिया क्षेत्रात परिवर्तन घडवून आणण्यासाठी व्यापक सुधारणा सुरू केल्या असल्याचं ते म्हणाले. अन्न प्रक्रिया क्षेत्रात १०० टक्के थेट परदेशी गुंतवणूक, प्रधानमंत्री किसान संपदा योजना आणि खाद्यप्रक्रिया उद्योगांसाठी प्रोत्साहन योजना यासारख्या उपक्रमांचा उल्लेख केला. सरकार लघु उद्योगांना सक्षम बनवण्यावर सरकार भर देत असल्याचं त्यांनी सांगितलं. देशात रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासाठी आधुनिक पायाभूत सुविधांची मजबूत परिसंस्था तयार करत असल्याचं ते म्हणाले. या परिषदेत अन्न सुरक्षा, गुणवत्ता मानकं यासारख्या मुद्द्यांवर तसंच अन्न सुरक्षा वाढवणे, अन्नाची नासाडी कमी करणे यासारख्या महत्त्वाच्या विषयांवर चर्चा होईल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली.
या चार दिवसीय परिषदेची सुरुवात आज नवी दिल्लीत भारत मंडपम इथं झाली. यामध्ये ९० हून अधिक देश, २६ राज्यं आणि केंद्रशासित प्रदेश सहभागी होत आहेत.