डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांची विविध राष्ट्रप्रमुखांबरोबर चर्चा

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी जी-सात शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर अनेक नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा केली. प्रधानमंत्र्यांनी काल दुपारी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन यांची भेट घेतली. संरक्षण, आण्विक, अवकाश, शिक्षण, हवामानविषयक तंत्रज्ञान, डिजिटल पायाभूत सुविधा, संस्कृती या क्षेत्रांमध्ये भागिदारी वाढवण्यासाठी काय करता येईल, याबाबत त्यांनी चर्चा केली. मेक इन इंडिया मोहिमेला बळ देण्यासाठी धोरणात्मक संरक्षण भागिदारी वाढवण्यावर त्यांचं एकमत झालं. फ्रान्समध्ये पुढील वर्षी होऊ घातलेल्या कृत्रिम बुद्धिमत्ता शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर हे तंत्रज्ञान, तसंच इतर उदयोन्मुख तंत्रज्ञानांमधील भागिदारी वाढवण्याबात दोन्ही नेत्यांचं एकमत झालं.

प्रधानमंत्री मोदी यांनी ब्रिटनचे प्रधानमंत्री ऋषी सुनक यांचीही भेट घेतली. राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळात भारत-ब्रिटन यांच्यातली धोरणात्मक भागिदारीला अधिक बळ देण्यास कटिबद्ध असल्याचं त्यांनी समाजमाध्यमांवरच्या एका संदेशात म्हटलं आहे. उभय देशांमध्ये सेमीकंडक्टर्स, तंत्रज्ञान आणि व्यापार या क्षेत्रांमध्ये परस्परसहकार्य वाढवण्याला संधी असल्याचं मत त्यांनी व्यक्त केलं. संरक्षण क्षेत्रातलं सहकार्य वाढवण्यावर उभय नेत्यांनी चर्चा केली.

मोदी यांनी युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्क्री यांच्याबरोबरही बैठक घेतली. युक्रेनमधल्या स्थितीच्या पार्श्वभूमीवर द्विपक्षीय संबंधांचा त्यांनी आढावा घेतला. संवाद आणि राजनैतिक संवाद यांच्या माध्यमातूनच संघर्षांमधून शांततामय मार्ग काढण्याला भारत प्रोत्साहन देत राहील असं प्रधानमंत्री मोदी यांनी स्पष्ट केलं.

इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी, जपानचे प्रधानमंत्री फुमिओ किशिदा यांच्याबरोबरच संयुक्त राष्ट्रांचे सरचिटणीस अँतोनिओ गुटेरस यांचीही मोदी यांनी भेट घेतली. दरम्यान, प्रधानमंत्री ही परिषद संपवून भारताकडे आज सकाळी रवाना झाले आहेत. भावी पिढीसाठी चांगलं जग तयार करण्यासाठी परिषदेत चांगली चर्चा झाली, असं मोदी यांनी समाजमाध्यमांवरच्या संदेशात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा