आगामी काळात भारत- रशिया संबंध आणखी दृढ होतील, असा विश्वास प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज व्यक्त केला. भारत – रशिया शिखर परिषदेप्रसंगी त्यांनी रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांच्याशी द्विपक्षीय चर्चा केली, त्यावेळी ते बोलत होते. गेली ४०-५० वर्ष भारत दहशतवादाचा सामना करत आहे, त्यामुळे मॉस्कोमधल्या दहशतवादी हल्ल्यावेळी झालेली वेदना आपण समजू शकतो, असं त्यांनी सांगितलं. कोणत्याही प्रकारचा दहशतवाद निंदनीय असल्याचं ते म्हणाले. रशियासोबतच्या सहकार्यामुळे भारतीय शेतकरी आणि भारतीय ग्राहकांचा मोठा फायदा झाला आहे, असं त्यांनी सांगितलं . जेव्हा संपूर्ण जग इंधन समस्येचा सामना करत होतं, तेव्हा रशियाच्या सहकार्यामुळे भारतातल्या सामान्य माणसाच्या इंधनाच्या गरज भागवता आल्या, याचा त्यांनी कृतज्ञतापूर्वक उल्लेख केला. भारत- रशिया यांच्यातल्या इंधन करारामुळे आंतरराष्ट्रीय बाजारात स्थैर्य यायला मोठी मदत झाली, हे जगानं स्वीकारलं पाहिजे, असंही ते म्हणाले.
त्याआधी या दोन नेत्यांनी मॉस्कोमधल्या प्रदर्शन केंद्राला भेट दिली. यावेळी त्यांना अणुऊर्जेसंबंधातलं चित्र प्रदर्शन दाखवण्यात आलं. मोदी त्यांनी क्रेमलिन इथल्या क्रांतिस्मारकाला भेट देऊन आदरांजली वाहिली.
प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज मॉस्कोमध्ये भारतीय समुदायाशीही संवाद साधला. तिसऱ्या सत्ताकाळात तीन पट वेगानं काम करून भारतीय अर्थव्यवस्थेला जगात तिसऱ्या क्रमांकावर न्यायचं आहे, याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी बोलताना केला. आज आपला देश आत्मविश्वासानं उभा आहे, ही अतिशय महत्वपूर्ण बाब असल्याचं ते म्हणाले.
जगाला भारताकडून अनेक अपेक्षा आहेत आणि त्या पूर्ण करण्याची एकही संधी आपण सोडणार नाही, असं त्यांनी सांगितलं.