डाउनलोड करा
मोबाइल ॲप

android apple
signal

‘हर घर तिरंगा’ अभियानात सहभागी होण्याचं प्रधानमंत्र्यांचं ‘मन की बात’ मधून आवाहन

येत्या १५ ऑगस्ट निमित्त हर घर तिरंगा अभियानात सहभागी होत संकेतस्थळावर तिरंग्यासोबतचा फोटो अपलोड करावा, असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी देशवासियांना केलं आहे. प्रधानमंत्र्यांनी आज आकाशवाणीवर मन की बात या कार्यक्रमातून देशवासीयांशी संवाद साधला. हा या कार्यक्रमाचा एकशे बारावा भाग होता. हर घर तिरंगा हे अभियान तिरंग्याचा गौरव करणारा उत्सवच झाला असल्याचं ते म्हणाले.

 

स्वातंत्र्य दिनानिमित्त होणाऱ्या भाषणासाठी दरवर्षीप्रमाणेच यंदाही नागरिकांनी MyGov किंवा NaMo App वर सूचना पाठवण्याचं आवाहनही त्यांनी केलं. यांपैकी जास्तीत जास्त सूचनांचा आपण स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात समावेश करू असं ते म्हणाले.

 

नुकत्याच झालेल्या आंतरराष्ट्रीय गणितीय ऑलिम्पियाड स्पर्धेत आजवरची सर्वोत्तम कामगिरी केलेल्या भारतीय विद्यार्थ्यांच्या चमूची कामगिरी त्यांनी देशवासीयांसमोर मांडली. या सगळ्यांनी देशाचा मान वाढवला, देशाचं नाव उज्ज्वल केलं असं म्हणत त्यांनी या कामगिरीची प्रशंसा केली. यावेळी प्रधानमंत्र्यांनी या स्पर्धेतले पदक विजेते पुण्याचे आदित्य वेंकट गणेश आणि सिद्धार्थ चोप्रा, दिल्लीचा अर्जुन गुप्ता, ग्रेटर नॉयडा इथला कणव तलवार, मुंबईचा ऋषील माथुर आणि गुवाहाटीचा आनंदो भादुरी यांच्याशी संवादही साधला.

 

सध्या ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धा सुरू आहे, ही स्पर्धा म्हणजे खेळाडूंना जागतिक पातळीवर तिरंगा फडकवण्याची संधी आहे असं म्हणत, या स्पर्धेत सहभागी झालेल्या भारतीय खेळाडूंना देशवासीयांनी पाठिंबा द्यावा असं आवाहनही त्यांनी केलं.

 

अंमली पदार्थांविरोधातल्या लढ्यातलं मोठं पाऊल टाकत केंद्र सरकारनं ‘मानस’ हे विशेष केंद्र सुरू केलं आहे. याअंतर्गत समुपदेशन आणि पुनर्वसनाबद्दलच्या माहितीसाठी १-९-३-३ हा टोल फ्री मदत क्रमांकही सुरू केला आहे, अशी माहिती प्रधानमंत्र्यांनी दिली. या क्रमांकावर अंमली पदार्थांविषयीची माहितीही कळवता येईल, त्याची गुप्तताही राखली जाईल असं सांगून देशाला अंमली पदार्थ मुक्त बनवण्यासाठी झटत असलेल्या सर्व व्यक्ती आणि संस्थांनीही या क्रमांकाचा वापर करावा, असं आवाहन त्यांनी केलं.

 

यावेळी प्रधानमंत्र्यांनी हातमाग आणि इतर स्थानिक उत्पादनं लोकप्रिय करण्यासाठी देशभरातल्या महिलांच्या प्रयत्नांची माहिती दिली. यात त्यांनी महाराष्ट्राची पैठणी तसंच विदर्भातली हँड ब्लॉक प्रिंट या हातमाग उत्पादनांचाही उल्लेख केला. अशी स्थानिक उत्पादनं लोकप्रिय करण्याच्या प्रयत्नात देशवासीयांनीही स्वतःचा वाटा द्यावा आणि ही उत्पादनं ‘हॅशटॅग माय प्रॉडक्ट माय प्राइड’ या नावानं समाज माध्यमांवर टाकावीत असं आवाहन त्यांनी केलं.

 

यंदा खादी ग्रामोद्योगाची उलाढाल पहिल्यांदाच दीड लाख कोटी रुपयांच्या पुढे गेली असून, खादी उत्पादनांच्या विक्रीत ४०० टक्क्याची वाढ झाली असल्याची माहितीही त्यांनी दिली. खादी आणि हातमागाच्या वाढत्या विक्रीनं मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी निर्माण होत असल्याचं ते म्हणाले.

 

उद्या जगभरात साजरा होत असलेल्या व्याघ्र दिनानिमित्त मोदी यांनी वाघ आणि मानवी संघर्ष संपुष्टात आणण्यासाठी, तसंच वाघांच्या संरक्षणासाठी देशभरात सुरू असलेल्या प्रयत्नांची माहिती आजच्या मन की बात मधून दिली. याचं उदाहरण म्हणून त्यांनी राज्यातल्या ताडोबा – अंधारी व्याघ्र प्रकल्पाचाही उल्लेख केला. या प्रयत्नांमध्ये लोकसहभाग मिळाल्यानं देशातल्या वाघांची संख्या दरवर्षी वाढत आहे असं सांगून, जगभरातल्या एकूण वाघांपैकी ७० टक्के वाघ आपल्या देशात असल्याचा अभिमान वाटतो असं ते म्हणाले.

 

प्रधानमंत्र्यांनी यावेळी आसाममधल्या ‘चराईदेऊ मैदाम’ या ठिकाणाचा युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांमध्ये समावेश झाल्याचं सांगून, नागरिकांनी भविष्यात या ठिकाणांना भेट द्यावी,असं आवाहन त्यांनी केलं.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा