प्रधानमंत्री नरेंद्र मोदी G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी आज ईटलीला रवाना झाले. भारत-इटली धोरणात्मक भागीदारी मजबूत करण्यासाठी तसंच भारत-प्रशांत आणि भूमध्यसागरीय प्रदेशांमध्ये सहकार्य वाढवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं आश्वासन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीला जाण्यापूर्वी दिलं.
इटलीच्या प्रधानमंत्री जॉर्जिया मेलोनी यांच्या निमंत्रणावरून ते G-7 शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी जात आहेत. यानिमित्तानं इटलीला भेट होत असल्याचा मला आनंद आहे, असंही मोदी म्हणाले. या परिषदेत, कृत्रिम बुद्धिमत्ता, ऊर्जा, आफ्रिका आणि भूमध्य सागरावर लक्ष केंद्रित केलं जाईल, असंही त्यांनी सांगितलं.
भारताच्या अध्यक्षतेखाली झालेल्या G-20 शिखर परिषदेचे परिणाम आणि आगामी G-7 शिखर परिषद यांच्यात अधिक समन्वय आणण्याची आणि दक्षिण विश्वासाठी महत्त्वपूर्ण असलेल्या मुद्द्यांवर विचारविनिमय करण्याची ही संधी असेल, अशी आशाही त्यांनी व्यक्त केली.