१६व्या ब्रिक्स शिखर परिषदेला उपस्थित राहण्यासाठी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आजपासून दोन दिवसांच्या रशिया दौऱ्यावर रवाना झाले असून ते थोड्या वेळापूर्वी कझानला पोहोचले. ब्राझील, रशिया, भारत, चीन आणि दक्षिण आफ्रिका या पाच देशांच्या ब्रिक्स समूहाची ही शिखर परिषद आजपासून कझान इथं सुरू होत आहे. ब्रिक्स समूहातलं परस्पर सहकार्य भारताच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं असून जागतिक महत्त्वाच्या विविध मुद्यांवर या परिषदेत चर्चा होईल असं प्रधानमंत्र्यांनी दौऱ्यावर रवाना होण्यापूर्वी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. या परिषदेच्या निमित्ताने भारत – रशिया द्विपक्षीय संबंधानाही चालना मिळेल असा विश्वास प्रधानमंत्र्यांनी व्यक्त केला आहे.
ब्रिक्स समूहानं सुरू केलेल्या उपक्रमांमधील प्रगतीचाही या परिषदेत आढावा घेतला जाणार आहे. उद्या या परिषदेचा मुख्य दिवस आहे. गेल्या वर्षी दक्षिण आफ्रिकेत जोहान्सबर्ग इथं या समुहाचा विस्तार करण्यात आला होता. त्यानंतर प्रथमच ही शिखर परिषद होत आहे. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यासमवेत द्विपक्षीय बैठक घेणार आहेत. तसंच परिषदेच्या निमित्ताने आलेल्या इतर देशांच्या प्रमुखांशीही ते द्विपक्षीय चर्चा करण्याची अपेक्षा असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाच्या अधिकाऱ्यानं सांगितलं.