गावखेड्यांचं रूपांतर समृद्धी आणि संधींचं प्रकाशमान केंद्र म्हणून करायला तसंच ग्रामीण भारताला सक्षम करायला केंद्र सरकारचं प्राधान्य असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज नवी दिल्लीत ग्रामीण भारत महोत्सवाचं उदघाटन झालं, त्यावेळी ते बोलत होते. वर्ष २०१४ पासून केंद्र सरकार सातत्यानं ग्रामीण भारताच्या विकासासाठी कार्यरत असून ग्रामीण जनतेला प्रतिष्ठेचं जीवन प्राप्त करून देण्यासाठी प्रयत्नशील आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. देशातल्या प्रत्येक गावात सर्व आवश्यक सोईसुविधा असाव्यात यासाठी केंद्र सरकारने अनेक योजना कार्यान्वित केल्या असल्याचं त्यांनी सांगितलं.
ग्रामीण समाजाला स्वयंपूर्ण बनवण्यासाठी प्रधानमंत्री किसान सन्मान निधी अंतर्गत शेतकऱ्यांना तीन लाख कोटी रुपयांची मदत करण्यात आल्याचं ते म्हणाले. याशिवाय स्वच्छ भारत अभियान, पीएम आवास, जल जीवन मिशन, शुद्ध पेय जल व्यवस्था, निरामय आयुष्यासाठी आरोग्यसेवा यांसारख्या योजना सुरु असून केंद्रीय मंत्रिमंडळानं नुकतीच पीएम पीक विमा योजनेला आणखी एक वर्षाची मुदतवाढ दिली आहे, गेल्या १० वर्षात कृषी कर्जाच्या रकमेत साडे तीन पट वाढ झाली. आता पशुपालक आणि मत्स्यपालकांनाही किसान क्रेडिट कार्ड दिले जात आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले. प्रधानमंत्र्यांनी या महोत्सवात सहभागी झालेल्या कारागिरांशी संवाद साधला. या महोत्सवाला केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आणि केंद्रीय अर्थराज्यमंत्री पंकज चौधरी उपस्थित होते.