कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापरातून नवसंशोधन आणि त्याचं नियमन यावर जागतिक पातळीवर चर्चा करण्याची गरज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केली. पॅरिसमध्ये आयोजित कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेत सहअध्यक्षपदावरुन ते बोलत होते. कृत्रिम बुद्धिमत्तेचे चांगले उपयोग खूप आहेत. मात्र त्याचवेळी त्यातून होणाऱ्या दुजाभावावर लक्ष देण्याची गरज त्यांनी व्यक्त केली.
फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन या परिषदेत सहअध्यक्ष झाले आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्री मोदी भारत-फ्रान्स द्विपक्षीय संबंध मजबूत करण्याच्या उद्देशाने फ्रान्सच्या अध्यक्षांबरोबर चर्चा करणार आहेत. फ्रान्समधल्या ऐतिहासिक मार्सेली शहराला प्रधानमंत्री भेट देणार असून तिथल्या पहिल्या भारतीय वाणिज्य दूतावासाचं उद्घाटन त्यांच्या हस्ते होणार आहे. त्याशिवाय उभय देशांचा संयुक्त प्रकल्प असलेल्या थर्मोन्युक्लिअर एक्सपरिमेंटर रिॲक्टर प्रकल्पाला ते भेट देतील. तसंच पहिल्या आणि दुसऱ्या महायुद्धात धारातीर्थी पडलेल्या भारतीय सैनिकांना मजारग्यूज युद्ध स्मशानभूमीत श्रद्धांजली अर्पण करतील. फ्रान्सचा दौरा आटोपून प्रधानमंत्री बुधवारी दोन दिवसांच्या अमेरिका दौऱ्यावर रवाना होणार आहेत.