हे युग युद्धाचं युग नसून प्रत्येक समस्येचं निराकरण हे युद्धातून शक्य नाही. युरेशिया आणि पश्चिम आशिया प्रदेशात शांतता प्रस्थापित व्हावी, अशी प्रत्येकाची इच्छा असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. लाओसच्या व्हिएन्तिआन इथं झालेल्या एकोणिसाव्या पूर्व आशिया शिखर परिषदेत आज ते बोलत होते.
जगाच्या विविध भागात सुरू असलेल्या संघर्षाचा ग्लोबल साउथ देशांवर होणाऱ्या परिणामांविषयीही त्यांनी चिंता व्यक्त केली. दहशतवाद हे जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी एक आव्हान असल्याचं सांगत प्रधानमंत्र्यांनी दहशतवादाविरुद्ध एकत्रितपणे काम करण्यावर भर दिला. हिंद-प्रशांत प्रदेशाच्या शांतता तसंच प्रगतीसाठी एक सर्वसमावेशक, मुक्त, समृद्ध आणि शिस्तबद्ध वातावरण आवश्यक आहे, असंही प्रधानमंत्री म्हणाले. तसंच, यागी वादळामुळे बळी पडलेल्यांप्रतिही शोक व्यक्त केला.