महाराष्ट्रात दहा वैद्यकीय महाविद्यालयं स्थापन होणं हा लाखो लोकांचं भलं करण्यासाठीचा महायज्ञ आहे, यामुळे राज्यातल्या युवकांसाठी नव्या संधीची दारं उघडतील, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज राज्यातल्या सात हजार ६०० कोटी रुपयांच्या विकास प्रकल्पांची दूरदृश्यप्रणालीद्वारे पायाभरणी केली. तसंच राज्यातल्या नवीन दहा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन केलं, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्राच्या इतिहासात आतापर्यंत इतक्या वेगाने आणि व्यापक स्तरावर कधीच विकास झाला नाही, असं प्रधानमंत्र्यांनी सांगितलं.
हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाला मिळालेल्या यशाबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला. यावेळी त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. आगामी विधानसभा निवडणुकीत एकजूट होऊन भाजपा आणि महायुतीला मतदान करण्याचं आवाहन प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं.
राज्यातल्या दहा वैद्यकीय महाविद्यालयं आणि विकास प्रकल्पांची पायाभरणी प्रधानमंत्र्यांनी केली. ही महाविद्यालयं मुंबई, अंबरनाथ, नाशिक, जालना, बुलढाणा, हिंगोली, वाशिम, अमरावती, भंडारा आणि गडचिरोली इथं सुरु होणार आहेत. या महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांसाठी एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या जागा ९०० ने वाढणार असून, एकूण ३५ महाविद्यालयात प्रतिवर्ष चार हजार ८५० एमबीबीएस जागा उपलब्ध होणार आहेत. नागपूर आणि शिर्डी विमानतळ इथल्या कामांचं भूमीपूजन तसंच भारतीय कौशल्य संस्था आणि विद्या समीक्षा केंद्राचं उद्घाटनही प्रधानमंत्र्यांनी यावेळी केलं.
नागपूर विमानतळामुळे विदर्भ आंतरराष्ट्रीय व्यापाराचं केंद्र होईल, परकीय गुंतवणूक वाढेल तसंच रोजगार निर्माण होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यावेळी म्हणाले.
तर महाराष्ट्रात दहा वैद्यकीय महाविद्यालयं सुरु होणं गौरवास्पद असून आपण विकसित भारताकडे वाटचाल करत आहोत, असं उपमुख्यमंंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.