अमेरिकेच्या तीन दिवसांच्या यशस्वी दौऱ्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी काल नवी दिल्लीत दाखल झाले. या दौऱ्यात त्यांनी क्वाड परिषद, संयुक्त राष्ट्रांच्या महासभेतील परिषद या दोन महत्त्वाच्या कार्यक्रमांसह अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन आणि क्वाड नेत्यांच्या भेटी, भारतीय समुदायाशी संवाद अशा अनेक कार्यक्रमांमध्ये सहभाग घेतला. डेलावेअरमधील विल्मिंग्टन इथं झालेल्या सहाव्या वार्षिक क्वाड परिषदेत आणि न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केलं. अमेरिकेचे अध्यक्ष ज्यो बायडेन यांच्याशी त्यांनी विविध मुद्द्यांवर चर्चा केली, तसंच क्वाड देशांच्या नेत्यांसोबतही त्यांनी द्विपक्षीय बैठकाही घेतल्या. न्यूयॉर्कमध्ये त्यांनी भारतीय समुदायाला संबोधित केलं आणि अमेरिकेतील तंत्रज्ञान कंपन्यांच्या उच्च अधिकाऱ्यांची भेट घेतली. युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमिर झेलेन्स्की आणि आर्मेनियाचे पंतप्रधान निकोल पशिन्यान यांच्याशीही प्रधानमंत्री मोदी यांनी संवाद साधला.
दरम्यान, अमेरिकेच्या तीन दिवसीय यशस्वी दौऱ्याबद्दल केंद्रीय मंत्री आणि राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या विविध नेत्यांनी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन केलं आहे. या दौऱ्यामुळं मुत्सद्देगिरीचा मोदी सिद्धांत आणखी मजबूत झाला आहे, ज्याने गेल्या दहा वर्षांमध्ये भारताला शाश्वत विकासाच्या उदाहरणांद्वारे जागतिक बदल घडवणाऱ्या भूमिकेकडे प्रवृत्त केलं आहे, असं केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी समाज माध्यमावरील संदेशात म्हटलं आहे. यशस्वी क्वाड परिषद, संयुक्त राष्ट्राची समिट ऑफ द फ्युचर हे कार्यक्रम मोदी यांची जगभरातील लोकप्रियता दर्शवतात. पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वामुळं केवळ एक राष्ट्र म्हणून भारताचा दर्जा वाढला नाही तर मानवतेच्या प्रगतीसाठी प्रत्येक देश भागीदार म्हणून भारताचा स्वीकार करत आहे, असंही शहा यांनी म्हटलं आहे.
Site Admin | September 25, 2024 9:59 AM | अमेरिका | प्रधानमंत्री नरेंद्र मोदी