प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज तीन दिवसांच्या रशिया आणि ऑस्ट्रिया दौऱ्यावर रवाना झाले. आपल्या समाजमाध्यमावरच्या पोस्टमध्ये त्यांनी म्हटलं आहे की, हा दौरा या दोन्ही देशांबरोबच्या भारताची मैत्री अधिक मजबूत करण्याची एक मोठी संधी आहे. त्याआधी विमानतळावरुन प्रसिद्ध केलेल्या निवेदनात त्यांनी सांगितलं की, भारत आणि रशियामध्ये गेल्या दहा वर्षात ऊर्जा, संरक्षण, व्यापार, गुंतवणूक, आरोग्य, शिक्षण, संस्कृती, पर्यटन आणि मनुष्यबळ क्षेत्रातली धोरणात्मक भागीदारी वाढली आहे. या दौऱ्यात प्रधानमंत्री रशियातल्या २२ व्या वार्षिक शिखर परिषदेत सहभागी होणार आहेत.
रशियाचे अध्यक्ष आणि आपले मित्र व्लादिमीर पुतीन यांच्याबरोबर भविष्यात सहकार्या संबंधातील सर्व शक्यतांचा या दौऱ्यात आढावा घेतला जाणार असल्याचंही प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. ऑस्ट्रिया हा भारताचा विश्वासू भागीदार असून दोन्ही देश लोकशाही मूल्यांचा आदर करणारे आहेत. या दौऱ्यात दोन्ही देशातील सहकार्य एका नव्या उंचीवर नेण्याचा प्रयत्न करण्यात येईल असंही त्यांनी सांगितलं.
प्रधानमंत्रीपदाची शपथ सलग तिसऱ्यांदा घेतल्यानंतर मोदी यांचा हा पहिलाच परदेश दौरा आहे.