प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली तिसऱ्यांदा सत्तेत आलेल्या केंद्रातील सरकारला शंभर दिवस पूर्ण झाले आहेत. या शंभर दिवसांच्या काळात या सरकारनं पायाभूत सुविधा, शेतकरी, मध्यमवर्ग, महिला आणि तरुणांवर लक्ष केंद्रित करून 15 लाख कोटी रुपयांचे प्रकल्प सुरू केले आहेत. सरकारनं देशातील युवा शक्तीला सक्षम करण्यासाठी, त्यांच्या आकाक्षांना पंख देण्यासाठी अनेक पावलं उचलली आहेत. या शंभर दिवसांमध्ये, केंद्र सरकारनं कौशल्य वाढविण्यासाठी आणि रोजगार निर्मितीसाठी प्रधानमंत्री पॅकेज अंतर्गत दोन लाख कोटी रुपयांची घोषणा केली असून देशातील चार कोटींहून अधिक तरुणांना याचा फायदा होणार आहे.
महत्त्वाच्या सरकारी परीक्षांमधील प्रश्नपत्रिका फुटण्याचे प्रकार रोखण्यासाठी आणि भरतीमध्ये पारदर्शकता आणण्यासाठी केंद्रानं कायदा लागू केला आहे. सरकारनं दहा हजार 600 कोटी रुपयांच्या खर्चाच्या विज्ञानधारा योजनेला मंजुरी दिली असून, ही योजना देशातील विज्ञान, तंत्रज्ञान आणि नावीन्यपूर्ण संशोधन परिसंस्था मजबूत करेल. या कालावधीत, सरकारनं व्यसनमुक्तीबद्दल सल्ला देण्यासाठी आणि नशा मुक्त भारत मोहिमेत योगदान देण्यासाठी अंमली पदार्थांच्या तस्करीबाबत तक्रार नोंदविण्यासाठी मानस हेल्पलाइन क्रमांक 1933 ही सुविधा सुरू केली आहे. तर, अर्थसंकल्पात विविध क्षेत्रांमध्ये रोजगार निर्मितीसाठी भांडवली खर्च 11 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवला आहे. पहिल्या शंभर दिवसांत, केंद्रीय मंत्रालये आणि विभागांमधील पंधरा हजार तरुणांना नियुक्तीपत्रं देण्यात आली आहेत.