दोन दिवसांच्या लाओस दौऱ्यानंतर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज संध्याकाळी मायदेशी परतले. लाओसची राजधानी व्हिएन्तिआन इथं झालेल्या १९ वी पूर्व आशिया शिखर परिषद आणि २१ व्या आसियान शिखर परिषेदत प्रधानमंत्री मोदी सहभागी झाले होते. हिंद-प्रशांत प्रदेशाच्या शांतता तसंच प्रगतीसाठी एक सर्वसमावेशक, मुक्त, समृद्ध आणि शिस्तबद्ध वातावरण आवश्यक असल्याचं मत त्यांनी मांडलं. प्रत्येक समस्येचं निराकरण हे युद्धातून शक्य नाही. दहशतवाद हे जागतिक शांतता आणि सुरक्षेसाठी एक आव्हान असल्याचं सांगत प्रधानमंत्र्यांनी दहशतवादाविरुद्ध एकत्रितपणे काम करण्यावर भर दिला.
मायदेशी परतण्यापूर्वी प्रधानमंत्री मोदी यांनी लाओचे राष्ट्रपती थोंगलाओन सिसौलिथ यांची भेट घेतली. यावेळी दोन्ही नेत्यांनी द्विपक्षीय संबंधांवर सविस्तर चर्चा केली या दौऱ्यात संरक्षण सहकार्य,सीमाशुल्क, दृकश्राव्य आणि वारसा संवर्धनासह सहा क्षेत्रात भारत आणि लाओ दरम्यान सामंजस्य करारांवर स्वाक्षऱ्या झाल्या.