विकसित भारताचं स्वप्न पूर्ण करण्यात नारी शक्तीची सर्वात मोठी भूमिका असणार आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. नवसारीतल्या वंसी-बोरसी इथं प्रधानमंत्री मोदी लखपती दीदी संमेलनाला संबोधित करताना बोलत होते. या कार्यक्रमात एक लाख महिला उपस्थित होत्या.
नारी शक्तीने देशाच्या प्रगतीची कमान सांभाळली आहे. महिलांचा सन्मान ही समाज आणि देशाच्या विकासाची पहिली पायरी आहे, असं प्रधानमंत्री म्हणाले.
माझ्या आयुष्यात मला कोट्यवधी माता-भगिनींचा आशीर्वाद मिळाला, हे माझं भाग्य आहे. हे आशीर्वाद सर्वात मोठी प्रेरणा आहे, असं मोदी यावेळी म्हणाले. लिज्जत पापड, अमूलसारख्या उद्योगातील महिलांच्या सहभागाचं त्यांनी कौतुक केलं. स्वयं सहाय्यता गटाच्या सामर्थ्याला वाढवण्यासाठी सरकारने या योजनेेचा निधी पाचपटींनी वाढवला, असं त्यांनी सांगितलं.
२०१४ नंतर देशात सर्वाधिक महिला मंत्रीपदी विराजमान झाल्या. २०१९ मध्ये ७८ महिला खासदार निवडून आल्या. अंतराळ मोहिमा, कार्यक्रमांमध्ये महिलांनी मोठं योगदान दिलं आहे. आज जगातल्या सर्वाधिक महिला वैमानिक भारतात आहेत, याचा आपल्याला अभिमान आहे, असंही ते म्हणाले. जी-सफल आणि जी-मैत्री या दोन योजनांचा शुभारंभही त्यांनी यावेळी केला.
तत्पूर्वी प्रधानमंत्र्यांनी आंतरराष्ट्रीय महिला दिनाच्या निमित्तानं आज गुजरातमधल्या नवसारी जिल्ह्यात ‘लखपती दीदी’ योजनेच्या दहा लाभार्थींशीही संवाद साधला.