प्रधानमंत्री नरेंद्र मोदी या महिन्याच्या २१ ते २३ तारखेदरम्यान अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या दौऱ्यात प्रधानमंत्री २१ सप्टेंबर रोजी डेलावेअरमधल्या विलमिंग्टन इथं होणाऱ्या चौथ्या क्वाड नेत्यांच्या शिखर संमेलनात सहभागी होतील. क्वाड शिखर परिषदेचं यजमानपद भूषविण्याची विनंती अमेरिकेनं भारताला विनंती केली असून, भारतानं २०२५ मध्ये क्वाड शिखर परिषदेचं यजमानपद भूषविण्यास सहमती दर्शविली आहे.
या शिखर परिषदेत क्वाडनं गेल्या वर्षभरात केलेल्या प्रगतीचा आढावा घेण्यात येईल, असं परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या निवेदनात म्हटलं आहे. भारतीय उपखंड – प्रशांत क्षेत्रातल्या देशांना त्यांच्या विकासाची उद्दिष्टं आणि आकांक्षा पूर्ण करण्यासाठी पुढील वर्षाचा कार्यक्रमही यावेळी निश्चित करण्यात येईल.
त्याचबरोबर मोदी २३ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत ‘समिट ऑफ द फ्यूचर’ला संबोधित करणार आहेत. ‘उज्ज्वल भविष्यासाठी बहुविध उपाययोजना’ ही या परिषदेची संकल्पना आहे. यावेळी ते विविध नेत्यांशी द्विपक्षीय बैठका घेऊन परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा करतील. प्रधानमंत्री २२ सप्टेंबर रोजी न्यूयॉर्कमध्ये भारतीय समुदायाच्या मेळाव्यालादेखील संबोधित करणार आहेत.