प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी ऑस्ट्रियाचे चॅन्सेलर कार्ल नेहमर यांच्याशी काल व्हिएन्नामध्ये चर्चा केली. गुंतवणूक आणि व्यापार, विज्ञान आणि तंत्रज्ञान, पर्यावरणपूरक ऊर्जा, कृत्रिम बुद्धिमत्ता, स्टार्टअप्स, पर्यावरण आणि हवामान बदल, सांस्कृतिक सहकार्य यांच्यासह द्विपक्षीय संबंधांबाबतच्या विविध मुद्द्यांवर त्यांनी चर्चा केली.उभय देशांच्या दृष्टीनं महत्त्वाच्या असलेल्या विविध विषयांवर दोन्ही नेत्यांनी मतं मांडली. बैठकीनंतर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात प्रधानमंत्री म्हणाले, की हवामान बदल आणि दहशतवादासह संपूर्ण मानवसृष्टीला भेडसावणाऱ्या मोठ्या आव्हानांबाबत चर्चा झाली. आंतरराष्ट्रीय सौर आघाडी, आपत्तींचा परिणाम न होणाऱ्या पायाभूत सुविधा आणि जैवइंधन आघाडी अशा भारतानं घेतलेल्या पुढाकारांना साथ देण्याची विनंतीही आपण केल्याचं प्रधानमंत्री म्हणाले. लोकशाही आणि न्यायप्रक्रियेवरचा विश्वास हा भारत-ऑस्ट्रिया संबंधांचा सबळ पाया असल्याचं प्रधानमंत्री मोदी यांनी नमूद केलं. नेहमर यांच्याबरोबर अतिशय उत्पादक चर्चा झाली आणि परस्पर सहकार्य वाढवण्याच्या नवीन शक्यताही चर्चेत पुढं आल्याचं ते म्हणाले. हे संबंध धोरणात्मक दिशेनं पुढं नेण्याचा निर्णय दोन्ही नेत्यांनी घेतल्याचंही त्यांनी सांगितलं. ही युद्धाची वेळ नसल्याचा पुनरुच्चार त्यांनी केला आणि युक्रेन आणि पश्चिम आशियासह विविध संघर्षांबाबत सविस्तर चर्चा झाल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. संयुक्त राष्ट्रं आणि इतर आंतरराष्ट्रीय संघटना कालसुसंगत आणि परिणामकारक बनवण्यासाठी सुधारणांची गरज असल्यावर चर्चेत एकमत झालं. ऑस्ट्रियाचे चॅन्सेलर कार्ल नेहमर यांनी, पायाभूत सुविधा, डिजिटलायझेशन आणि पायाभूत सुविधांचा वेग या गोष्टींबाबत भारताचं यश थक्क करणारं असल्याचं मत व्यक्त केलं. मोदी रशिया आणि ऑस्ट्रियाच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर होते आणि काल दौऱ्याचा शेवटचा दिवस होता. काल मोदी यांचं काल व्हिएन्नामध्ये समारंभपूर्वक स्वागत करण्यात आलं. भारतीय नागरिकांनी त्यांचं उत्साहात स्वागत केलं. गेल्या 41 वर्षांतला भारतीय प्रधानमंत्रीांचा हा पहिलाच ऑस्ट्रिया दौरा आहे. हा दौरा आटोपून प्रधानमंत्री आज सकाळी मायदेशी परतले आहेत.
Site Admin | July 11, 2024 11:39 AM | चॅन्सेलर कार्ल नेहमर | नरेंद्र मोदी