प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी इटलीमधे अपुलिया इथं आज विविध राष्ट्रांच्या प्रमुखांशी द्विपक्षीय चर्चा केली. जी सेव्हन देशांच्या शिखर परिषदेसाठी मोदी सध्या इटलीत आहेत. आज दुपारी त्यांनी फ्रान्सचे अध्यक्ष इमॅन्युएल मॅक्राँ यांच्याशी चर्चा केली. संरक्षण, अंतराळ, शिक्षण, हवामान बदल, पायाभूत सुविधा, उर्जा, क्रीडा इत्यदी क्षेत्रातल्या परस्पर सहकार्याविषयी त्यांची बातचीत झाली. जागतिक आणि क्षेत्रीय महत्त्वाच्या मुद्द्यांवरही उभय नेत्यांमधे विचारांची देवाण घेवाण झाली. पुढच्या वर्षी फ्रान्समधे होणाऱ्या कृत्रिम बुद्धिमत्ताविषयक संमेलन आणि संयुक्त राष्ट्रांच्या महासागरविषयक परिषदेच्या अनुषंगानं, अद्ययावत तंत्रज्ञान विषयक सहकार्य वाढवण्यावर दोघांचं एकमत झालं. पॅरिसमधे होऊ घातलेल्या ऑलिंपिक आणि पॅरा ऑलिंपिक क्रीडास्पर्धांच्या आयोजनासाठी मोदी यांनी मॅक्राँ यांना शुभेच्छा दिल्या. जी सेव्हन देशांच्या प्रमुखांबरोबरही मोदी द्विपक्षीय चर्चा करत आहेत.
युकेचे प्रधानमंत्री ऋषी सुनक यांच्याबरोबर संवाद झाल्याचं, तसंच युके बरोबर सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारी वाढवण्यासाठी रालोआ सरकार आपल्या तिसऱ्या कार्यकाळात सज्ज असल्याचं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. सेमीकंडक्टर, आणि इतर तंत्रज्ञान तसंच व्यापार आणि संरक्षण क्षेत्रात उभयपक्षी संबंध दृढ करण्याविषयी दोन्ही नेत्यांनी चर्चा केली. युक्रेनचे अध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांच्याशीही प्रधानमंत्र्यांची चर्चा झाली. उभयपक्षी हिताच्या मुद्दयांवर बातचीत झाल्यावर युक्रेनमधल्या परिस्थिती वर चर्चा आणि संवादाच्या मार्गानेच तोडगा निघेल अशी भारताची दृढ धारणा असल्याचं मोदी यांनी सांगितलं.
Site Admin | June 14, 2024 7:45 PM | G7 | Italy | Prime Minister Modi | इटली | जी ७ देश | प्रधानमंत्री मोदी