प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून फ्रान्स आणि अमेरिकेच्या दौऱ्यावर जाणार आहेत. दोन्ही देशांशी आर्थिक, तंत्रज्ञानात्मक आणि धोरणात्मक भागीदारी दृढ करणं हा या दौऱ्याचा हेतू आहे. १० ते १२ फेब्रुवारी रोजी ते फ्रान्समधे कृत्रिम बुद्धिमत्ता कृती शिखर परिषदेत उपस्थित राहतील, तसंच अनेक द्विपक्षीय चर्चांमधे सहभागी होतील. मार्सेली इथं सुरू होत असलेल्या भारताच्या नव्या वाणिज्य दूतावासाच्या उद्घाटन समारंभालाही ते हजेरी लावणार आहेत.
कृत्रिम बुद्धिमत्ता ही काही लोकांची किंवा कंपन्यांची मक्तेदारी बनू नये याची भारताला चिंता आहे, असं भारताचे फ्रान्समधले राजदूत संजीव कुमार सिंगला म्हणाले. कृत्रिम बुद्धिमत्ता सुरक्षित, सर्वसमावेशी असणं आवश्यक आहे असं ते म्हणाले.
फ्रान्सची भेट आटोपून १२ फेब्रुवारीला प्रधानमंत्री अमेरिकेला रवाना होतील. डोनाल्ड ट्रम्प यांनी अमेरिकेच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतल्यानंतर काही आठवड्यातच प्रधानमंत्री या देशाला भेट देत असल्यानं, त्यांचा अमेरिका दौराही फ्रान्सइतकाच महत्त्वाचा मानला जात आहे.