प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज छत्तीसगढ मधे ३३ हजार सातशे कोटी रुपये पेक्षा जास्त खर्चाच्या विविध विकासकामांची पायाभरणी आणि लोकार्पण केलं. बिलासपूर जिल्ह्यात मोहभट्टा इथं झालेल्या या कार्यक्रमात वीज निर्मिती, रस्तेबांधणी, रेल्वे, शिक्षण आणि गृहनिर्माण प्रकल्पांचा समावेश होता. आदिवासी भागाच्या विकासाकरता धरती आबा जनजाती उत्कर्ष अभियान सुरु झाल्याचा उल्लेख त्यांनी केला. नक्षली उपद्रवाने त्रस्त भागात आता शांतीचं युग आलं असून त्या भागातल्या अनेक बंद पडलेल्या शाळा आता सुरु झाल्या आहेत असं ते म्हणाले. विकासाची फळं आदिवासी भागातल्या प्रत्येकापर्यंत पोहचावी याकरता सरकार प्रयत्नात कसूर करणार नाही अशी ग्वाही त्यांनी दिली. काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे आतापर्यंत नक्षलवादी कारवायांना प्रोत्साहन मिळत राहिलं, अशी टीका त्यांनी केली.
प्रधानमंत्री आवास योजना ग्रामीण अंतर्गत ३ लाख लाभार्थ्यांना घरांच्या किल्ल्या प्रधानमंत्र्यांच्या हस्ते देण्यात आल्या. अभनपूल- रायपूर दरम्यान मेमू गाडीचं उद्घाटनही त्यांच्या हस्ते झालं.