भारत आणि पोलंडनं परस्परांबरोबरचे संबंध धोरणात्मक भागीदारीत परिवर्तित करण्याचा निर्णय घेतल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. वॉर्सा इथं पोलंडचे प्रधानमंत्री डोनाल्ड टस्क यांच्या बरोबर झालेल्या चर्चेनंतर त्यांनी हे निवेदन जारी केलं. दोन्ही देशांमधल्या राजनैतिक संबंधांचं यंदा ७० वं वर्ष असून, भारत-पोलंड संबंध लोकशाही आणि कायद्याचं राज्य यासारख्या सामायिक मूल्यांवर आधारित असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. जागतिक आव्हानांचा सामना करण्यासाठी संयुक्त राष्ट्र आणि इतर आंतरराष्ट्रीय संस्थांमध्ये सुधारणा येण्याची गरज आहे, यावर दोन्ही बाजूंमध्ये सहमती झाल्याचं यात म्हटलं आहे.
युक्रेन आणि पश्चिम आशियामध्ये सुरू असलेला संघर्ष सर्वांसाठी चिंतेचा विषय असून, कोणतीही समस्या युद्धभूमीवर सोडवली जाऊ शकत नाही यावर भारताचा ठाम विश्वास असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. प्रधानमंत्री मोदी आणि पोलंडचे प्रधानमंत्री टस्क यांच्यात झालेल्या चर्चेमध्ये द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यात आला आणि विविध मुद्द्यांवर विचारांची देवाणघेवाण झाली. या बैठकीमुळे परस्पर हिताच्या मुद्द्यांवर चर्चा झाल्याचं या निवेदनात म्हटलं आहे.