भारत सर्वच क्षेत्रात अभूतपूर्व प्रगती करत असून जगाचं भविष्य घडवण्यासाठी तो पुढाकार घेत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. एका खासगी माध्यम समूहाने नवी दिल्लीत आयोजित केलेल्या जागतिक शिखर परिषदेला ते संबोधित करत होते. जग अनिश्चिततेच्या गर्तेत असताना भारत आशेचा किरण म्हणून उदयाला आला असं म्हणतानाच मोदी यांनी कोविड, जागतिक अर्थव्यवस्था, महागाई, हवामान बदल, बेरोजगारी आणि युद्ध यांसारख्या जागतिक परिस्थितीच्या भारतावर होणाऱ्या परिणामांचा उल्लेख केला.
राष्ट्रीय लोकशाही आघाडीच्या तिसऱ्या कार्यकाळातल्या विकासकामांविषयीही प्रधानमंत्र्यांनी यावेळी सांगितलं. रालोआ सरकारने तिसऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या सव्वाशे दिवसांत ९ लाख कोटी रुपयांच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना मंजुरी दिल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. या काळात ८ विमानतळांचं बांधकाम सुरू झालं तसंच १५ नवीन वंदे भारत रेल्वे गाड्याही सुरू झाल्याचं ते म्हणाले. देशाचा परकीय चलन साठाही या काळात ७०० अब्ज डॉलर्सपेक्षा जास्त झाल्याची माहिती प्रधानमंत्र्यांनी यावेळी दिली.