जम्मू काश्मीर मध्ये सध्या लोकशाहीचा उत्सव सुरू असून पहिल्यांदाच दहशतवादाची भिती न बाळगता मतदान झालं, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. जम्मू काश्मीरमधल्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज श्रीनगरमधल्या प्रचारसभेला संबोधित करताना ते बोलत होते. केंद्रशासीत प्रदेशात मोठ्या प्रमाणात मतदान झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांनी समाधान व्यक्त केलं. जम्मू काश्मीरची जनता देशाच्या लोकशाहीला बळकट करत आहे, असंही ते म्हणाले.
प्रधानमंत्री संध्याकाळी कतरा आणि वैष्णो देवीच्या बेस कॅम्पमध्ये प्रचारसभा घेणार आहेत. त्याआधी प्रधानमंत्र्यांनी डोडा इथल्या सभेला संबोधित केलं. सरकारनं मागच्या काही दिवसात जम्मू काश्मीरमध्ये केलेल्या विकासकामांची उजळणी त्यांनी यावेळी केली. दरम्यान, जम्मू काश्मीरमध्ये दहा वर्षांनंतर विधानसभेची निवडणूक होत आहे. ही निवडणूक तीन टप्प्यात होत असून पहिल्या टप्प्यातलं मतदान काल शांततेत पार पडलं.